निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभागरचना व आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली.
पुणे मेट्रो लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २३ महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना व आरक्षण सोडतीबाबत झालेली सर्व प्रक्रिया रद्द करण्यात यावी. जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत निवडणूक संदर्भात कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेली असून निवडणुकीची प्रभागरचना व आरक्षण सोडत नव्याने करण्यात याव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभागरचना केली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाच्या कचाट्यात आडकल्यानंतर ओबीसींना वगळून आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाचे व महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले. ओबीसींचा समावेश करून नव्याने सोडत जाहीर करण्यात आली. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वी विधीमंडळ बैठकीत निवडणूक प्रभागरचनेत सुधारण करण्यासंदर्भात निर्णय घेतला.
Comments
Post a Comment