प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे : देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे. क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हुतात्मा शिवराम हरि राजगुरू जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. हुतात्म्यांच्या देशभक्तीचा जागर झाला पाहिजे. त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबत देशसेवेसाठी नागरिकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. देश विकासाच्या मार्गावर पुढे जात असताना या प्रक्रीयेला गती देताना देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिविरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतील. माझे नाही तर देशाचे आहे, असा राष्ट्रभाव जागृत ठेवण्यासाठी आपण शपथ घेतली पाहिजे. ...