यूटय़ूब पाहून तरुणी आणि महिलांचे व्हॉट्सऍप हॅक करून त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱयाला अखेर अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.
पुणे मेट्रो लाईव्ह :
यूटय़ूब पाहून तरुणी आणि महिलांचे व्हॉट्सऍप हॅक करून त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱयाला अखेर अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. रवी बनावर्स दांडू असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात मोबाईल आणि 11 सीमकार्ड जप्त केले आहेत.रवी ज्या बँकेत काम करायचा तेथील महिलांना देखील त्याने अश्लील मेसेज पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.
अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीला फेब्रुवारी महिन्यात एक फोन आला. फोन करणाऱयाने आपण कॉलेजचा शिक्षक बोलत असल्याचे भासवले. शिक्षणासाठी कॉलेजचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करायचा आहे असे सांगून तरुणींकडून ओटीपी घेतला. ओटीपी घेतल्यानंतर त्याने तरुणीचे व्हॉट्सऍप हॅक केले. त्यावरून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. याप्रकरणी तरुणीने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. सहाय्यक निरीक्षक दिगंबर पगार यांच्या पथकातील राजेंद्र पेडणेकर, सूर्यवंशी, जाधव आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीडीआर काढला. त्यावरून पोलिसांनी रवीला धारावी येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केला असून तो लवकरच फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाणार आहे.
सीमकार्डचा केला गैरवापर
रवी हा ऐरोली येथे एका खासगी बँकेत कामाला आहे. लॉकडाऊनपूर्वी रवीला एक रस्त्यात सीमकार्ड मिळाले. त्या सीमकार्डवर रवीने व्हॉट्सऍप ऍक्टिव्ह करून ते कार्ड फेकून दिले होते. लॉकडाऊनमध्ये घरी असतानाच त्याने यूटय़ूबवर व्हॉट्सऍप कसे हॅक करायचे याचे व्हिडीओदेखील पाहिले होते. रवीने बनावट नावाने 11 सीमकार्ड आणि 7 मोबाईल विकत घेतले होते.
मौजेसाठी पाठवायचा मेसेज
रवी हा मौजेसाठी महिलांना अश्लील मेसेज पाठवायचा. मेसेज पाठवल्यावर तो त्या नंबरचा फोन बंद करून ठेवायचा. त्याने त्याच्यासोबत काम करणाऱया महिला सहकाऱयांनादेखील अश्लील मेसेज पाठवले होते. त्याने मोबाईलमध्ये 'रश' नावाने तीनशे महिलांचे नंबर सेव्ह करून ठेवले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सऍप क्लोनचे काही ऍप्सदेखील आढळून आले आहेत. त्याने विकत घेतलेले ते फोन चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Comments
Post a Comment