पुणे मेट्रो लाईव्ह :
कोल्हापूर : (जिमाका): गडहिंग्लज नगरपरिषदेअंतर्गत धडक कारवाईत 1200 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती गडहिंग्लज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली
गडहिंग्लज नगरपरिषदमध्ये सिंगल युज प्लास्टिक विरोधात गेले एक महिना मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत श्री. खारगे यांना नदी वेस परिसरात एका व्यक्तीकडे सिंगल युज प्लास्टिकचा साठा असून त्याच्यामार्फत शहरात इतरत्र विक्री होत असल्याची टीप मिळाली. यानंतर श्री. खारगे यांनी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड यांना डमी गिऱ्हाईक बनवून त्या व्यक्तीच्या घरी पाठवले. तिथे प्लास्टिक मिळत असल्याची खात्री पटताच श्री. खारगे यांच्या नेतृत्वात प्लास्टिक विरोधी पथकाने धडक कारवाई करत त्या व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली. तपासणी अंती घरामध्ये व दुकानात असे एकूण 1200 किलो सिंगल युज प्लास्टिक सापडले. त्या व्यक्तीचे दुकान सील करण्यात आले असून सर्व प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
सिंगल युज प्लास्टिक विरोधातील कारवाई अशीच सुरू राहणार असून सर्व व्यापारी व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन श्री. खारगे यांनी केले. या कारवाईत नगरपरिषदेचे अनिल गंदमवाड, रवीनंदन जाधव व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.


Comments
Post a Comment