पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे
गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!! तस्मै श्री गुरवे नमः !! आज व्यासपोर्णिमा त्यालाच आपण गुरुपौर्णिमा असेही म्हणतो.भारत अर्थात हिंदुस्थान म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील जागतिक मार्गदर्शक देश! अवघ्या विश्वाला वेद, उपनिषद, रामायण,महाभारत,भगवत गीता, म बसवेश्वरांचे व शरणांचे वचन, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदायातील विविध संतांचे अभंग, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने तयार केलेले संविधान, विविध साहित्यिकांनी लिहिलेले साहित्याद्वारे ज्ञानाचा भांडार खुला करणारा विश्वगुरु म्हणजे हिंदुस्थान!!
याच भुमीत अनेक साधुसंत,महर्षी जन्माला आले म्हणूनच आपल्या देशाला देवभुमी असेही म्हंटले जाते. आज सर्व प्रकारच्या गुरुंना वंदन करण्याचा दिवस!! आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गुरुपरंपरा या देशात उदयास आल्या. याच गुरुपरंपरेतील एक महान गुरु म्हणजेच चालता बोलता देव अशी ज्यांची ख्याती होती ते ज्ञानयोगी परमपुज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी होय. श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांनी आपले गुरु वेदांतकेसरी श्री मल्लिकार्जुन महास्वामींजीच्या विचारांचा वसा व वारसा चालवत कर्नाटक,महाराष्ट्र व परदेशातही आपल्या अमृतवाणीने ज्ञानाच्या जोरावर साध्या,सोप्या, सरळ , तरल,मृदु भाषेत जीवन जगण्याची कला शिकवली. 'साधी राहणी उच्च विचारसरणी' या उक्तीचे आयुष्यभर पालन करत कोणतेही अवडंबर न माजवता सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु मानुन त्यांनी आपल्या कन्नड,मराठी, इंग्रजी प्रवचनातून वेदांत, पातंजल योगसुत्र सोपे करुन सांगितले. 'मानवता हाच खरा धर्म' ही शिकवण देत; श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांनी जीवन जगताना कोणत्याही परिस्थितीत न डगमगता स्वतःवर ,स्वतःच्या क्षमतेवर दृढविश्वास ठेऊन निसर्गाच्या सानिध्यात पाने, फुले, पशु, पक्षी कसे जगतात त्यांचे निरीक्षण करून आपणही असेच निस्वार्थपणे जगण्याचा प्रयत्न करा आपले जीवन सुखमय,समृद्धमय,आनंदमय,निरामय होण्यास वेळ लागणार नाही असे मौलिक तत्वज्ञान शिकवत होते. ज्ञानयोगाश्रम विजयपुर कर्नाटक येथे प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला मोठा सत्संग भरतो. आपल्या आयुष्यातील सर्व गुरुंचे स्मरण करत गुरूंचरणी लीन होण्यासाठी मोठया संख्येने भाविक भक्त विजयपुर येथे जपयज्ञात सहभागी होतात.पण यावर्षी गुरु श्री सिद्धेश्वर स्वामीजी यात शरीररुपाने नसणार कारण 2 जानेवारी 2023 ला स्वामीजींचे देहावसान झाले. पण आत्मा अमर असल्याने व विचाररूपाने स्वामीजी चराचरात नक्कीच उपस्थित असणार हे मात्र नक्की! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु वंदनेच्या पार्श्वभूमीवर प पु ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होत असताना डोळे पाणावतात व गुरुवर्यांच्या प्रवचनातील विचारांप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा मिळते." गुरु गुरु नही भगवान होते है !! मेहसुस तब होता है; जब वह हमसे जुदा होते है!! गुरु के बिना जीना एक सजा है!! और गुरु के साथ जीने मे कुछ और ही मजा है!! गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुवर्यांना त्रिवार वंदन!! (शब्दांकन : डॉ कुमार रामगोंडा पाटील मु पो: शिरढोण, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चारिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्र दत्तनगर शिरोळ)
Comments
Post a Comment